अस्तित्वावर माझ्या तुझी घट्ट पकड राहते,
दूर गेले कितीही तरी मी शेवटी तुझीच राहते.
मला इथवर आणणारा तो जुना रस्ता गेला कुठे?
या विचारात वाट पुढे चालते, चालतच राहते.
हृदयी रुतला काटा खोलवरी आज असे का वाटावे?
नेमक्या कोणत्या भावनेची बोच सलत राहते ?
प्रश्न नाही असा कि जीवना, एवढा का तुझा ताबा मजवरी?
प्रश्न आहे असा - मी तुझ्यावर एवढी विसंबून का राहते?
उभारले जरी मनाला पुन्हा आज नव्याने ,
तडा राहतो , डाग राहतो, जखम ठसठसत राहते.
तरी नव्या निर्धारांनी भरून वाहते मनाची नदी,
एक शाश्वती जेव्हा पुलाच्या कडेला उभी राहते.
No comments:
Post a Comment